Skip to content
सन १९८१ साली खंडू भाऊ ठाकरे व लताबाई खंडू ठाकरे यांच्या पोटी वांजळे या छोट्याशा खेडेगावात माझा जन्म झाला. माझे वडील वडिलोपार्जित शेती व दुग्धव्यवसाय करून पोट भरत असत. या गरीब परंतु संस्कारी घरात माझे बालपण छान गेले. रायगड जिल्हा परिषदेच्या वांजळे शाळेत माझे प्राथमिक शिक्षण पूर्ण झाले. तर याच ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या काळभैरव शाळेत माझे माध्यमिक शिक्षण पूर्ण झाले. शालेय जीवनात अभ्यासाकडे माझा कल बेताचाच होता, पण म्हणतात ना, “बिघडी को सुधारना मेरा पेशा ही नहीं, मेरा धर्म है,” तसंच काहीसं माझंही होतं. इलेक्ट्रॉनिक उपकरणे दुरुस्त करण्याबाबत मला प्रचंड रुची होती. या सर्व अतिरिक्त बाबी विचारात घेता मी कसेबसे बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. त्यामुळे आवड लक्षात घेता शेती व दुग्धव्यवसायात वडलांना मदत करता करता मी कल्याण येथे जाऊन रीतसर टेलिव्हिजन, टेपरेकॉर्डर, मिक्सर यासारखी उपकरणे दुरुस्त करण्याचे शिक्षण आत्मसात केले व अल्पावधीतच कर्जत सारख्या परिसरात मी टेलिव्हिजन, टेपरेकॉर्डर, मिक्सर यासारखी उपकरणे दुरुस्त करू लागलो. रात्री छंद म्हणून मी गावात चालणाऱ्या भजन व कीर्तनाकडे आकृष्ट झालो आणि येथेच मी मृदुंग व तबला ही दोन कलावाद्ये अगदी सहजरित्या आत्मसात केली. आजही कुठेही भजन चालू असेल तर माझे पाय त्या दिशेकडे आपसूकच वळतात आणि माझी बोटे तबल्याच्या शाईवर फिरण्यासाठी आतुर होतात. बदलत्या काळानुसार आपणही बदलले पाहिजे म्हणून काळाची पावले ओळखून टेलिव्हिजन दुरुस्तीसह केबल व्यवसायातही मी पदार्पण केले. पाच वर्षे हा व्यवसाय मी जिकिरीने सांभाळला. परंतु डी२एच च्या आगमनानंतर आमच्या केबल व्यवसायात हळूहळू मंदी येऊ लागल्याने आम्ही भावंडांनी मिळून कर्जत येथे कपड्याचा व्यवसाय सुरु केला. परंतु या व्यवसायात देखील आम्हाला अपयश आले व होता नव्हता तो सारा पैसा आम्ही यात गमावून बसलो. परंतु म्हणतात ना, “ज्याने दात दिले तो दाण्याचीही व्यवस्था करतोच,” याच उक्तीप्रमाणे सार्वजनिक बांधकाम विभागातील काही अधिकारी लोकांशी माझी ओळख वाढली. त्यांना माझा स्वभाव नम्रपणा, किंवा माझी चिकाटी म्हणा, अखेर मला सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पहिले १ लाख रुपयांचे माथेरान येथील सरकारी रेस्ट हाऊसच्या दुरुस्तीचे काम मिळाले व येथेच माझ्या आयुष्याला खऱ्या अर्थाने कलाटणी मिळाली. यानंतर अनेक कामे केल्यानंतर अखेर एक कोटी इतक्या रक्कमेचे पेठारवाडी चाफेवाडी नदीवरील पुलाचे काम मला मिळाले व या कामानंतर खऱ्या अर्थाने आमच्या कुटुंबाला स्थैर्य प्राप्त झाले. त्यामुळे याच क्षेत्रात पुढे कार्य करत असताना आपल्याला वेळोवेळी लागणाऱ्या डांबर प्लांटची निर्मिती आपण स्वतः करावी अशी कल्पना माझ्या डोक्यात आली. परंतु हा एवढा धाडसी निर्णय मी घेऊ नये असे अनेक जणांनी सुचवून देखील ती कल्पना मी २०१५ साली साकार केली व त्यामुळेच माझी यशस्वी उद्योजक म्हणून माझी गणना होऊ लागली. या कामाच्या निमित्ताने वारंवार माझे मंत्रालयात जाणे येणे होत असे. याच काळात २०१६ साली मा. श्री. रविंद्रजी चव्हाण यांना रायगड जिल्हाचे पालकमंत्री मिळाले व मला माझे राजकीय गुरु मिळाले. साहेबांमुळेच मी राजकारणाकडे आकृष्ट झालो व भारतीय जनता पक्षाची रायगड जिल्हा युवा मोर्चा उपाध्यक्ष पदाची जबाबदारी १ वर्ष मी पार पाडली. वित्तीय अर्थसंकल्पीय अधिवेशन मार्च २०२३ रोजी माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला भारतीय जनता पक्षाच्या वतीने पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी १०० कोटी पेक्षा जास्त निधी देण्यात आला. या निधीतून कर्जत खालापूर विधानसभा क्षेत्रात भरीव विकासकामे मी मार्गी लावली. ८ जून २०२३ रोजी पक्षाने माझ्या कामाची पोचपावती म्हणून कर्जत खालापूर विधानसभा मतदार संघाच्या निवडणूक प्रमुख या पदाची जबाबदारी माझ्याकडे दिली. आजपर्यंत पक्षाने दिलेल्या निधीतून मी रस्ते, पूल, ड्रेनेज लाईन, समाजमंदिर, व्यायामशाळा, गणेशघाट, साकव, सुशोभीकरण, पथदिवे यांसारखी अनेक प्रलंबित कामे पूर्ण केली व अजूनही हा विकासरथ असाच चालू आहे व कायम तो असाच चालू ठेवण्यात येईल अशी ग्वाही मी देतो.